नवी दिल्ली : राज्यसभेतील शपथविधीवेळी 'जय भवानी, जय शिवाजी' घोषणा दिल्यानंतर सभापतींनी हटकल्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करु नका. हा विषय इथेच थांबवा, असं आवाहन संबंधितांना केलं. शिवाजी महाराजांच्या नावाने याआधी भरपूर राजकारण झालं आहे. महाराजांचा अवमान झाला असता तर मी गप्प बसलो नसतो, मी तिथल्या तिथे राजीनामा दिला असता. जे काही घडलंच नाही, परंतु असं भासवायचं हे करु नका, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी संजय राऊत आणि शिवसेनेलाही प्रत्युत्तर दिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'राज्यसभेच्या विरोधी बाकांवरुन इतर सदस्यांकडून आक्षेप घेण्यात आला. राज्यघटनेमध्ये जी शपथ आहे तेवढीचं घ्यावी लागते. त्यापुढे काही म्हणता येत नाही. त्यावेळी सभापती व्यंकया नायडू यांनी इतर सदस्यांना थांबवत हे कोणाचं घर नाही, त्यामुळे रेकॉर्डवर केवळ घेतलेली शपथ जाईल आणि सर्व सदस्यांनी ज्या भाषेत शपथ घ्यायची आहे ती घ्या परंतु त्यापुढे काही जोडू नका, अशी विनंती केली. त्यांनी केवळ घोषणा राज्यघटनेला धरुन नसल्याचं सांगितलं, महाराजांचा अवमान झाला असता तर मी गप्प बसलो नसतो' असं उदयनराजे म्हणाले.


खासदार उदयनराजे भोसले यांच्या खासदारकीच्या शपथवेळी दिलेल्या घोषणेवरुन आता मानापमानाचं राजकारण सुरु झालं आहे. महाविकासआघाडीच्या नेत्यांनी थेट सभापती व्यंकया नायडू यांच्यावर टीका केली आहे. तर काही नेत्यांनी भाजपला छत्रपती शिवाजी महाराज निवडणूकीपूरते हवे असल्याचं वक्तव्य केलं आहे. उदयनराजे यांच्या घोषणेवरुन वाद चिघळत असल्याचं दिसून येतंय. 


'जय भवानी, जय शिवाजी' अशा घोषणा यापुढे देऊ नका, असे निर्देश सभापतींनी उदयनराजेंना दिले. याच घोषणेवरुन राज्यातदेखील वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी ट्विट करुन संताप व्यक्त केला आहे. तर संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना टोले दिले आहेत. 


उदयनराजेंच्या शपथेवरुन सभापती व्यंकय्या नायडू काय म्हणाले?